!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!

रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

श्री स्वामी समर्थ महाराज एक विश्व चैतन्य शक्ती


जगाचे चालक मालक पालक दत्तप्रभू भगवान परब्रम्ह
श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन....

               आखिल विश्वाचा मुलाधार असणारे ब्रम्हांडनायक म्हणजे परब्रम्ह श्री स्वामी महाराज होय. भगवान दत्तात्रयांनी या पृथ्वीतला वेगवेगळ्या स्वरुपात अवतार धारण केले. परंतु इ.स. ११४९ साली परब्रम्ह भगवान श्री दत्त महाराजांनी एक आगळा वेगळा आणि आखिल विश्वाला आधार देणारा पूर्णावतार धारण केला आणि तो म्हणजे आजानुबाहू सुहास्य वदन असणारे जगाचे चालक मालक पालक दत्तप्रभू पूर्ण  परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज होय.
               पंजाब प्रांतात, छेली खेडे गावामध्ये इ.स. ११४९ मध्ये शके १०७१ चैत्र शुध्द २ या दिवशी मध्यरात्री १२ वा. धरती दुभंगून एक बालक बाहेर आले आणि परब्रम्ह श्री गुरु दत्त महाराजांनी एक आगळा वेगळा अविष्कार धारण केला, तो म्हणजे परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज... हिमालयातील सिध्द योगी पुरुषांपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्व जणांना मार्गदर्शन करण्यासाठी, प्रत्येकांच्या जन्माला नवी दिशा देण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा अयोनी संभव अवतार धारण केला.
               प्रथमत: श्री स्वामी महारांजांनी इ.स. १३७८ मध्ये भाद्रपद शुध्द ४ या शुभ दिवशी गोदावरी नदीच्या काठी राजमहेंद्रीजवळ पीठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार घेतला. संन्याशी स्वरुपात राहून अनेकांना मार्गदर्शन केले.  इ.स. १५२८ मध्ये श्री स्वामी महाराज कुरवपूर येथे कृष्णा नदीमध्ये गुप्त झाले आणि या अवतार कार्यातून मुक्त होऊन विदर्भातील कारंजा येथे श्री नृसिंह सरस्वती हा अविष्कार धारण केला. संपूर्ण भारतभर भ्रमंती करुन सर्व भक्तांना मार्गदर्शन करुन त्यांच्या डोक्यावर आपल्या आशिर्वादाचा वरदहस्त ठेवला आणि श्री क्षेत्र गाणगापूर सारखे तीर्थक्षेत्र निर्माण केले. इ.स. १६७८ मध्ये श्री शैल्यास जातो असे सांगुन पुन्हा गुप्त झाले. गुप्त रुपात राहून श्री स्वामी महाराजांचे कार्य थांबले नाही, तर अनेक भोळ्या भाबड्या  भक्तांना अनुभूती देऊन त्यांना मार्गदर्शन केले.
              इ.स. १८५६, आश्विन शुध्द ५ या शुभ दिनी जगाचे चालक मालक पालक दत्तप्रभू भगवान पूर्ण परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले. २२ वर्षे श्री स्वामी महाराजांनी प्रचंड कार्य केले. या २२ वर्षाच्या काळात अनेक मती गुंग करणा-या अगम्य लीला श्री स्वामी महाराजांनी केल्या.  इ.स. १८७८ मध्ये समाधीस्त होण्याचे नाटक केले. मात्र आपल्या असंख्य भक्तांना एकच आशिर्वाद दिला... भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्याच प्रमाणे हेही सांगितले की,
अनन्याश्चिन्त यंतो मां ये जन: पर्युपासते !
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं !! 
             जो भक्त माझी अनन्य भावाने सेवा करील त्याचा योगक्षेम मी चालविल त्याचं मी सदैव रक्षण करील. असा आशिर्वाद देऊन आजही हे जगाचे चालते बोलते पूर्ण परब्रम्ह आपल्या भक्तांच्या सदैव पाठीशी उभे असल्याचा प्रत्यय येतो. श्री स्वामी समर्थ ही आखिल विश्वाची चैतन्य शक्ती असुन हे एक गुरु तत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले , " हम गया नहीं जिंदा है " आणि याचा प्रत्यय आज लाखो, करोडो, असंख्य भाविक भक्त घेत आहेत.
            खरे पाहता, श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतलीच नाही. ती महाराजांची एक अगम्य लीला होती. सुदैवाने आपल्या सर्व भक्तांच्या संरक्षणार्थ आजही महाराजांचे कार्य चालूच आहे.
            सर्व वाचक बंधु भगिनींना नम्र विनंती की,  ही चूक भूल माफ असावी. महाराजांची सेवा आणि कार्य या माध्यमातून स्वामी महाराजांना आपणां सर्वांच्या ह्रदयापर्यंत पोहचविण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे.
!! श्री स्वामी समर्थ !!
लेखन - श्री. गणेश गायकवाड




© या ब्लॉगवरील माहितीचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. ©

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Copyright श्री स्वामी सेवा वर जाण्यासाठी